Benefits of Beetroot – Language: Marathi

kishor Jun 19, 2021 | 1236 Views
 • Health

Share with:


बीट विषयी प्राथमिक माहिती:-
• बीट हे थंड हवामानातील पीक असून बीटची प्रत , रंग , चव आणि उत्पादन थंड हवामानात चांगले येते. बीटची लागवड ही कोणत्याही जमीन प्रकारात लागवड करता येणारे बीट हे विविध विकारांवर उपयोगी आहे. बीट हे अनेक पोषक घटकांनी युक्त असून जर आहारात आपण त्याचा वापर केला तर अनेक दृष्टीने आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. बीटमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, विटामिन बी1, बी2 आणि सी तसेच फॉलिक ऍसिड असते. बऱ्याच व्यक्तींना रक्त कमी असते अशा व्यक्तींसाठी बीट फार फायदेशीर आहे.

 

बीट या वनस्पतीचा समावेश ॲमरँटेसी कुलात होत असून तिचे शास्त्रीय नाव बीटा व्हल्गॅरिस आहे. लाल बीट आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बीट हे जमिनीखाली वाढणारे एक कंदमूळ आहे. बीट ही द्विवर्षायू वनस्पती असून तिचे मूळ मांसल असते. मुळाचा रंग गडद लाल, सोनेरी पिवळसर असून आकार लांबट निमुळता असतो. फुलोऱ्यातील एकापेक्षा जास्त फुले एकत्र वाढून संयुक्त फळ तयार होते. फळ बोंड स्वरूपाचे असून पिकल्यावर आडवे फुटते. फळात २ ते ५ गोलाकार बिया असतात.

 

बीटाचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यांपैकी भाजीचा बीट म्हणजे टेबल बीट आणि साखरेचा बीट म्हणजे शुगर बीट हे प्रकार व्यापारीदृष्ट्या महत्वाचे आहेत. थंड तापमानात वाढलेल्या बिटामध्ये उच्च प्रमाणात साखर व उच्च दर्जाचा रंग आढळतो. बीट हे लोह, जीवनसत्त्वे, फॉलिक आम्ल आणि खनिजांचा उत्तम स्रोत आहे. बिटामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढते. यातील अँटिऑक्सिडंटमुळे शरीरात अनेक रोगांना प्रतिकार करण्याची क्षमता तयार होते. याचबरोबर नायट्रेट, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, सोडीअम, जीवनसत्त्व ब १ (थायमिन), ब २ (रायबोफ्लेवीन) आणि क (अस्कॉर्बिक आम्ल) हे तत्त्व बिटाचे औषधी गुणधर्म वाढवतात. बद्धकोष्टता आणि त्वचेच्या समस्येवर बीट उपयुक्त आहे.

 

या व्यतिरिक्त बीट, उच्च रक्तदाबदेखील नियंत्रित ठेवते तसेच रक्त शुद्धीकरण करते. बिटाचे उपयोग लक्षात घेता यापासून खाद्यपदार्थ निर्मितीला चांगली संधी आहे. भरपूर पोषण तत्त्व असलेल्या या कंदमुळाचा आहारात केवळ सॅलड म्हणून वापर मर्यादित असल्याचे दिसून येते. बीटपासून जर विविध प्रक्रिया केलेले पदार्थ बनवले तर बीटचा आहारात समावेश वाढवता येऊ शकतो. बीटपासून आर.टी.एस., जॅम, मार्मालेड, जेली, लोणचे, मफिन्स, वाइन असे प्रक्रिया पदार्थ तयार करता येतात. त्यामुळे बीटचा आहारात वापर वाढवण्यासाठी बिटवर प्रक्रिया करणे सहज शक्‍य आहे.

 

बीटमध्ये असणारे पोषक तत्वे:-
बीटमध्ये मुख्यतः (८७%) पाणी, (८%) कर्बोदके, आणि (२-३%) फायबर असते. बीटमध्ये कमी कॅलरीज मध्ये अनेक जीवनसत्व असतात.

बीट मधील पोषक घटक (१०० ग्रॅम )

घटक १०० ग्रॅम
कर्बोदके 9.56 g
साखर 6.67 g
तंतु 2.8 g
प्रथिने 1.16 g
जिवनसत्व B 1 0.031 mg
जिवनसत्व B6 0.067 mg
जिवनसत्व C 4.9 mg
कॅलसियम 16 mg
लोह 0.8 mg
ज़िंक 0.35 mg
पाणी 87.50 g

 

आहारात बीट खाण्याचे फायदे:-

 1. रक्त वाढते- लोह आणि फॉलिक ऍसिडचे प्रमाण अधिक असल्यामुळे बीटचा उपयोग रक्त वाढवण्यासाठी होऊ शकतो. रोज सकाळी एक कप बीटचा रस प्यावा.
 2. बीटमध्ये कमी कॅलरीज असतात तसेच शून्य टक्के फॅट असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी घेतलेल्या डाइट प्लानमध्ये याचा समावेश करणे फायदेशीर ठरते. बीट किंवा बीटचा रसात फायबर्स आणि कॅल्शियम, लोहसारखे पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात.
 3. बीटचा रस प्यायल्याने शारीरिक ताकद वाढते तसेच वजन वाढत नाही आणि चरबी कमी होण्यास मदत होते.
 4. बीट खाल्ल्याने अन्नाचे पटकन पचन होते तसेच बीट खाल्ल्याने शरीरात ऊर्जेची पातळी वाढते. बीटमध्ये असलेल्या नाइट्रेट घटकांमुळे रक्तवाहिन्यांचा विस्तार होण्यास मदत होते.
 5. कॅल्शियम शरीरासाठी महत्त्वाचा घटक आहे. हाडे आणि दात मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. बीट खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर होऊन दात आणि हिरड्या मजबूत होतात.
 6. बीटमध्ये फ्लेव्होनॉइड्स, फायबर असल्यामुळे त्यांचा रंग लाल आणि जांभळा असतो. शरीरामधील असलेला एलडीएल कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होते. तसेच हृदयविकाराचा त्रास कमी होतो. बीटामध्ये एंटीऑक्सीडेंट आणि विटामिन सी भरपूर प्रमाणात असते त्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या तसेच कोरडेपणा दूर होतो. बीटमध्ये असलेल्या फायबरमुळे बद्धकोष्टता दूर करण्यासाठी मदत होते. बद्धकोष्टता दूर करण्यासाठी औषध म्हणून बीटचा उपयोग होतो.
 7. बीटमुळे कफ होण्याची समस्या दूर होते. त्यामुळे श्वसननलिका स्वच्छ ठेवण्याचे काम व्यवस्थितपणे करतो. बीटच्या रसामध्ये मध टाकून जर शरीरावर खाज येत असेल त्या जागेवर लावले तर होणाऱ्या खाज येण्याची समस्या दूर होते तसेच बीट मुळे सांधेदुखीचा त्रास ही भरपूर प्रमाणात कमी होतो. म्हणून आपण आहारामध्ये सुयोग्य प्रमाणात जर बीटचा वापर केला तर शरीरासाठी ते फार फायदेशीर ठरू शकते.

 

बीटचे विविध प्रक्रियायुक्त पदार्थ:-

१) बीटरूट गर

 • बीट घेऊन ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. नंतर त्यांची साल काढून घ्या. बीट प्रेशर कूकरमध्ये १ शिट्टी होईपर्यंत शिजवावे. नंतर बीटाचे मध्यम आकाराचे तुकडे करावेत. त्यांचा मिक्सरमध्ये गर काढा.
 • त्यानंतर बिटचा गर स्वच्छ कापडातून घट्ट पिळून गाळून घ्यावे. नंतर मिश्रणामध्ये ४ ग्रॅम जिरेपूड, २ ग्रॅम मिठ, २५० ग्रॅम साखर आणि ४ ग्रॅम लिंबाचा रस घालून मिक्स करावे. नंतर मिश्रण ५ मिनीटे तापवावे. तयार झालेला बीटरूट गर निर्जंतुक केलेल्या बाटल्यांत भरून बाटल्या सीलबंद कराव्यात. बीटरूट रसाच्या बाटल्या थंड व कोरड्या वातावरणात साठवाव्यात.

२) बीटरूट आर. टी. एस.

 • आर. टी. एस. म्हणजे तहान शमविणारे, पचनाला सोपे, भूक वाढविणारे रेडी टू सर्व्ह पेय. असे पेय विविध फळांपासून बनवतात. असेच आर. टी. एस. बीटपासूनसुद्धा बनवता येऊ शकते. प्रथम बिट स्वच्छ धुऊन, साल काढून कापून घ्यावे. बीटच्या कापलेल्या तुकड्यांचा मिक्‍सरमधून गर तयार करावा.
 • एक लिटर आर. टी. एस. तयार करण्यासाठी ८५० मिली पाण्यात १२० ग्रॅम साखर ढवळून त्यात ०.५ ग्रॅम सायट्रिक ॲसिड व १६० ग्रॅम बीटचा गर मिसळून १० ते १५ मिनीटे उकळून गाळून घ्यावा. तयार झालेले हे बीटरूट आर. टी. एस. थंड करून बाटल्यांमध्ये भरून ठेवावे.

३) बीटरूट जॅम

 • बीट घेऊन ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. नंतर त्यांची साल काढून घ्या त्याचे बारीक बारीक तुकडे करून मिक्सरमधून बारीक करून घ्यावा. नंतर एका पातेल्यात १ किलो साखर आणि १ किलो बीटचा गर शिजवण्यास ठेवा.
 • सर्व घटकपदार्थ एकत्र मिसळून मिश्रण ठराविक घटटपणा ६८.५ डिग्री ब्रिक्‍स येईपर्यत शिजवावे. शिजवताना मिश्रण पळीने हलवावे व ४ ग्रॅम सायट्रिक आम्ल टाकावे. तसेच मिश्रण सारखे ढवळत राहावे.
 • बीटरूट जॅम गरम गरम असतानाच निर्जंतुक केलेल्या काचेच्या बरणीत भरावे व नंतर पॅरिफिन वॅक्सने सील करावे. बाटल्या थंड व कोरड्या वातावरणात साठवाव्यात.
लेखक बद्दल
किशोर आणेराव .
अन्नतंत्र महाविद्यालय
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी ४३१-४०२

Comments (0 Comments)

Leave a Reply

Your email address will not be published.

Witan Search

I am looking for

Witan Search